• Menu
  • Menu

आमच्याबद्दल

“पाऊलवाट” ही उमेश, अमृता आणि वेद यांच्यासह जगभरातील प्रवासाच्या दिशेने एक सुंदर वाटचाल आहे. आम्ही जवळपास १५ वर्षांपासून जगभर प्रवास करत आहोत. आमच्या आतापर्यंतच्या प्रवासादरम्यान आम्ही आशिया, ऑस्ट्रेलिया , यूएस आणि युरोप मधील सुमारे ३८ देशांचा प्रवास केला आहे.

आम्हाला फिरायला खूप आवडते.  विविध देशातील निसर्ग सौंदर्य आणि तेथील संस्कृती शोधण्याचे आम्हाला वेडच आहे असे म्हटले तरी चालेल.

आम्ही आमच्या व्यावसायिक जीवनात अडथळा न आणता योग्य रीतीनें सुट्यांचे नियोजन  करून  किमान वर्षातून एकदा किंवा दोनदा तरी प्रवास करतो.

प्रवासाचे योग्य नियोजन करणे ही आमची एक गुरुकिल्ली आहे.  किमान सहा ते आठ महिन्या आधी प्लॅन करण्याची गरज असते.  जे की आम्ही नेहमी करतो.

ट्रॅव्हल ब्लॉग लिहिण्याचे कारण म्हणजे आमचा अनुभव आणि आम्ही फिरलेल्या देशाची माहिती इतर प्रवाशान पर्यंत पोहचवणे , जेणेकरुन त्यांचा येणाऱ्य प्रवास नियोजनात मदत होईल.

चला तर मग आपली पाऊलवाट चालू करूया.

पण मग आणखी एक प्रश्न तुमच्या मनात येत असेल, ब्लॉग / वेबसाइट हि मराठीतच का?

उत्तर खूपच सोपे आहे आणि ते म्हणजे, एवढी मौल्यवान माहिती आपल्या मराठी समाज बांधवान पासून वंचित का ठेवायची?

आपणा सर्वांना माहिती आहे की आज २१ व्या शतकात ब्लॉग/वेबसाइट आणि व्हिडिओ खूप सामान्य गोष्ट झाली आहे, ते काही पहिल्या सारखे कढीण नाही राहिले. आजकाल लहान मुले बोलायला सुरुवात करण्यापूर्वीच फोन हाताळायला शिकतात हे वास्तव्य आहे. इंटरनेटवर इंग्रजी किंवा इतर सगळ्या भाषेचे अनेक साहित्य उपलब्ध आहेत

पण मग मराठी चे काय? माझा निदर्शनास असे आले की इतर सगळ्या भाषेचा तुलनेत मराठी भाषे मध्ये परदेशी ट्रॅव्हल ब्लॉग खूपच कमी उपलब्ध आहेत.

तसेच जुनी पिढी ही नवीन पिढीच्या तुलनेत वारंवार YouTube पाहत नाहीत, खरं तर त्यांना अजूनही स्थानिक वृत्तपत्र, मासिके वाचायला आवडतात किंवा ते मोबाईल मध्ये सुद्धा मराठी भाषेत लिहलेले लेख, माहिती वाचण्यास प्राधान्य देतात.

मराठी भाषेत ट्रॅव्हल ब्लॉग लिहिणे हा स्थानिक लोकांच्या हृदयाशी असलेला थेट संबंध आहे, याचा अर्थ असा नाही की मी इतर भाषांनवर आक्षेप घेत आहे, माझ्या मातृभाषेसह जगातील इतर भाषांना सुद्धा मी तितकेच महत्त्व देतो.

एक साधे उदाहरण घेऊ, जेव्हा तुम्ही जगात कुठेही किंवा अगदी भारतातील वेगळ्या राज्यात फिरताना, तुमची स्थानिक भाषा बोलू शकणार्‍या व्यक्तीला भेटल्यावर तुम्हाला ताबडतोब अधिक आरामदायी आणि सुरक्षित वाटू लागते, हे स्वाभाविकच आहे. आपण असे मी म्हणू शकतो की हे पूर्णपणे वेगळे बंधन आहे आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबातील कोणीतरी भेटल्याची भावना निर्माण होते.

शेवटी, मला माझा अनुभव माझ्या आई-वडिलांसोबत आणि इतर वृद्ध पालकांसोबत शेअर करायचा आहे, बराचश्या कारणांमुळे आपल्या पालकांना जगभर फिरण्याची खूप कमी संधी उपलब्ध असते. पण ते आमच्या ब्लॉगद्वारे जगातील विविध ठिकाणे आणि त्यांची माहिती त्यांना सहजरित्या अनुभवता येईल.

या वेबसाइट द्वारे, तुमचे प्रवास नियोजन प्रक्रिया खूपच सुलभ होईल आणि तुम्हाला हव्या असल्येल्या पुढील ठिकाणांना भेट देण्यासाठी प्रेरणा मिळेल अशी आम्ही आशा करतो.

उमेश [ UK ]

मित्रानो, मी उमेश

ब्लॉगर, चित्रकार, प्रवासी, इंटिरियर डेकोरेटर, आर्मी फोर्सचा सदस्य आणि राष्ट्रीय पर्यावरण एजन्सी स्वयंसेवक!

मी मुंबईतील माध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलेला आणि वाढलेला मुलगा, ज्याच्याकडे प्रवासाची प्रचंड आवड आणि जगभर फिरण्याचे डोळ्यात मोठे स्वप्न.

२००७ पासून सिंगापुर ला स्थायिक आसून, ऑस्ट्रेलिया मधील “Murdoch” विद्यापीठातून व्यवसायात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आणि सध्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये मॅनेजर आहे.

पॅकेज टूर किंवा टूर गाईड ची सहायता न घेता मी स्वतः विविध देशातील प्रवासाचा कार्यक्रम आखतो, नवीन ठिकाणांना भेट देणे, जगभरातील जीवनातील स्थानिक संस्कृतींमध्ये जाणे, हायकिंग आणि ट्रॅकिंग करणे आवडते!  विमानातून उतरताना, मला नेहमी माझ्या पासपोर्टवर शिक्का मारण्याची आणि आगमन हॉलमधून बाहेर पडण्यासाठी एक नवीन साहस सुरू करण्याची घाई असते.

मी ब्लॉग तयार करण्यामागचे मूळ कारण हेच आहे कि जेणेकरुन मला माझ्या ट्रिपची ऑनलाइन डायरी भविष्यात पाहण्यासाठी मिळू शकेल.

आतापर्यंतच्या कालावधीत मी ३७ हून अधिक देश फिरलो, त्याचा मला खूप अभिमान आहे. जगभरातील फिरलेल्या ठिकाणाची सर्वोत्तम माहिती व मार्गदर्शन देण्यासाठी बनवलेली हि वेबसाइट “पाऊलवाट”

आशा आहे की, माझ्या वैयक्तिक अनुभवांवर आधारित, मी तुम्हाला तुमच्या सुट्ट्यांचा अधिकाधिक फायदा घेण्यास मदत करण्यासाठी काही उपयुक्त माहिती आणि प्रवासाच्या टिप्स देऊ शकेल आणि कदाचित तुमच्यापैकी काहींना, अशा अनेक देशांना भेट देण्यासाठी प्रेरित करू शकेल ज्यांचा तुम्ही पूर्वी कधी विचार केला नसेल.

हे वाचण्यासाठी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. मी माझ्या प्रवासाच्या कथा आणि फोटो तुमच्यासोबत शेअर करण्यास उत्सुक आहे.

कधी, कुठे आणि कसे ह्याचे उत्तर देण्यासाठी सज्ज आसलेले आमचे ब्लॉग वाचत रहा !

अमृता [ AK ]

नमस्कार मी अमृता,

छायाचित्रकार, उत्कृष्ट फॅशन आणि खाद्यप्रेमी, प्रवासाची ठिकाणे शोधणे, वेबसाइट प्रशासक आणि “पाऊलवाट” या वेबसाईट च्या मागे असलेली आधारस्तंभ !

बिझनेस फायनान्समध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आणि फायनान्स क्षेत्रात 14 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. सध्या जागतिक नामांकित सोशल मीडिया कंपनीत काम करत आहे.

अहमदनगर या शहरात जन्मलेली एक साहसी, उत्साही मुलगी. लग्ना नंतर मुंबई ते सिंगापुर आसा टप्पा उमेशच्या बरोबरीने गाठला.

प्रत्येक देशातील प्रवासामध्ये तेथील थानिक खाद्यपदार्थे, तेथील फॅशन शैली आणि अविस्मरणीय ठिकाणे शोधण्याची जबाबदारी हि माझी असते आणि मी ती खूपच आवडीने पार पाडते. प्रवासा दरम्यान मोठ्या हॉटेल्स मध्ये राहाण्यापेक्षा आम्हाला छोट्या आणि काहीतरी वेगळ्या ठिकाणी राहण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो. आमचा ब्लॉग मध्ये आम्ही आता पर्यंतच्या फिरल्येल्या ठिकाणाची नव्हे तर तेथील अद्वितीय हॉटेल्स आणि तिथले असणारे लोकप्रिय खाण्याबद्दल पण माहिती उपलब्ध करून दिली आहे.

मागील १५ वर्षात आम्ही ३७ हुन अधिक देश फिरल्या कारणाने आता तर माझे मन नेहमी अस्वस्थ असते आणि मी नेहमी प्रवास करण्यासाठी पुढील नवीन ठिकाण शोधण्यात विलिप्त असते.

“पाऊलवाट” ही आम्ही इतर प्रवाशांना अधिक आत्मविश्वासाने प्रवास करण्यास कशी मदत करू शकेल, नवीन आणि अपरिचित ठिकाणी भेट देणार्‍या प्रवाशाचा प्रवास नियोजनाचा ताण कसा कमी करता येईल या करता उचलले हे पाऊल.

इथेच पाऊलवाटची सुरवात होते, आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे प्रवास करू इच्छिणाऱ्या करता  बनवलेली हि वेबसाइट आणि आमचे प्रवास ब्लॉग.

error: Content is protected !!